प्रसिद्ध जादूगार प्रसाद कुलकर्णी यांनी शोधली व्यवसायाची वेगळी वाट!

या लॉकडाऊन मध्ये सर्वांनाच प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेकांचे चालू व्यवसाय ठप्प झाले. यात सर्वच वर्गाचा समावेश आहे. कलाक्षेत्रसुद्धा याला अपवाद ठरू शकले नाही. आपल्या जादूने भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही प्रेक्षकांना भुरळ घालणारे जादूगार प्रसाद कुलकर्णी यांच्या ह्या अनोख्या जादूची ही खास गोष्ट आपल्या सिंहगड मित्रच्या वाचकांसाठी आम्ही आणली आहे. जादूगार प्रसाद कुलकर्णी हे वयाच्या 7 व्या वर्षांपासून जादू क्षेत्रात काम करीत आहेत. आजवर त्यांनी 10,000 पेक्षा जास्त यशस्वी प्रयोग सादर केले आहेत. तसेच मॅजिक वर्ल्ड इव्हेंट या कंपनीची स्थापना त्यांनी 1999 मध्ये केली त्या अंतर्गत वाढदिवस, बारसे, डोहाळे जेवण, मुंज इत्यादी कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन केले जाते. आज ही कंपनी महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट कंपनी म्हणून ओळखली जाते. परंतु ह्या लॉकडाऊन मुळे सर्वच इव्हेंटवर निर्बंध आले आहेत. पुढील एक ते दिड वर्ष कोणतेही शोज होण्याची शक्यता नाहीय. त्यामुळे आता पुढे काय? हा प्रश्न सर्वांप्रमाणेच जादूगार प्रसाद कुलकर्णी यांना पडला आणि त्यांनी आपले क्षेत्र सोडून वेगळ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. सिंहगड रोडवर त्यांनी वडापाव चालु करण्याचे ठरविले परंतु लॉकडाऊन मुळे सर्वच दुकाने बंद असल्याने व्यवसाय चालु कसा करायचा हा प्रश्न होता. शेवटी इच्छा असेल तर मार्ग दिसतोच. दुकानाचा बोर्ड बनविण्यासाठी फ्लेक्सची दुकाने उघडण्याची वाट न बघता त्यांनी हाताने कार्डशीटवर वडापाव नाव लिहून तो बोर्ड बनविला. केटरींग व्यवसायातील मित्रांकडून मोठी भांडी, शेगडी मिळवली आणि चालू झाले कुलकर्णी वडापाव…
आता व्यवसायाची जाहिरात करायची तर आजूबाजूच्या भागात जाहिरातपत्रके वाटणे गरजेचे होते परंतु सर्व प्रिंटिंग प्रेस बंद असल्याने तेही करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी एक नवी शक्कल लढवली. पहिले तीन दिवस त्यांनी खास ओपनिंग ऑफर म्हणून अवघ्या एक रुपयात वडापाव दिला. शेवटी जे काम जाहिरातपत्रके वाटून झाले नसते ते या ऑफरने झाले. एक रुपयात वडापाव मिळतोय म्हणल्यावर दुकानाच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या आणि आपोआपच माऊथ पब्लिसिटी झाली. त्या लागलेल्या रांगा अजूनही कमी झालेल्या नाहीत. आजच्या घडीला दिवसाला 1000 ते 1500 वडापाव सहज विकले जातात. वडापावची चव वाढवण्यासाठी त्यात 5 ते 6 भाज्यांचे मिश्रण घातले जाते. संपूर्ण पदार्थ जेमिनी रिफाईंड तेलात बनविले जातात. उच्च दर्जाचे बेसन, बटाटा आणि भाज्या यामुळे एक आगळीवेगळी चव लोकांना देता आली. शेवटी कोणतेही काम कमी नाही हेच यातून दिसून येते. पुढील काळात कुलकर्णी वडापावच्या शाखा संपूर्ण पुण्यात चालु होणार आहेत. पेशाने जादूगार असलेल्या या तरुणाने दाखवलेला व्यवसायाचा हा मार्ग इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here