मुंबई | आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला मुंबईतील कोरोनाचं नवं हाॅटस्पाॅट म्हटलं जात होतं. मात्र आरोग्य प्रशासन, सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांच्या कामातून धारावीतील कोरोना बाधितांची आकडेवारी आटोक्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही धारावीचं कौतुक करण्यात आलं.
धारावीतील यशावरून राज्यात मात्र चांगलंच राजकीय नाट्य पहायला मिळालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाविकासआघाडी या दोघांतील धारावीच्या श्रेयवादाचं राजकारण टोकाला जाऊन पोहचलं. सरकारकडून संघाच्या या दाव्याची खिल्ली देखील उडवली जाऊ लागली.
अखेरीस भाजपकडून धारावीतील संघाच्या कामाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे. भाजप नेते सुरेश हाळवणकर यांनी धारावीतील संघाच्या कामाचा व्हिडीओ ट्विटरवरून प्रसारित केला आहे.
संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत जाऊन कोरोना संशयितांना शोधण्याचं काम सुरू केलं. अन उपचारासाठी मदत केली. यामुळे कोरोना संक्रमणाचा वेग आटोक्यात आला. विश्व हिंदू परिषद, जनकल्याण समिती, मायग्रिन सोसायटी, स्वर्गीय अशोक सिंहल रूग्ण सेवा केंद्र, हिंदू जागरण मंच आणि निरामय सेवा फाऊंडेशन या संघाच्या संबंधीत संस्थांनी एकत्रीत येत धारावीत चोख कामगिरी पार पाडल्याचा दावाही व्हिडीओतून करण्यात आला आहे.
एवढं काम करूनही दुर्दैव की, राजकीय विरोध म्हणून काही जण संघाच्या कामावरच शंका उपस्थित करत आहे. केवळ संघांच नव्हे तर अनेक कोव्हिड योद्ध्यांच यात योगदान आहे. याचा अर्थ असा होत नाही की, संघाच्या स्वयंसेवकांनी काहीच काम केलं नाही, अस मत देखील व्हिडीयोतून व्यक्त करण्यात आलं आहे.