मुंबई – मार्चच्या मध्यापासून मॉल बंद आहेत. ते लवकर चालू झाले नाहीत तर 50 लाख कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होईल, असे मॉल चालकांच्या संघटनेने म्हटले आहे. शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना या संबंधात पत्र लिहिले आहे. या संघटनेशी संलग्न 75 मॉल महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यातील 50 टक्‍के मॉल मुंबई महानगर प्रदेश, 20 टक्‍के मॉल पुणे, 30 टक्‍के मॉल इतर भूप्रदेशात आहेत. त्याचबरोबर आणखी 30 मॉल पूर्ण होण्याच्या अवस्थेत आहेत. मॉल चालू ठेवण्यासाठी पुरवठा, विक्री, विपणन आदी क्षेत्रांत मनुष्यबळ लागते. या संघटनेचे अध्यक्ष अमिताभ तनेजा यांनी सांगितले की, हे मॉल चालू करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची आमची तयारी आहे.

8 जूननंतर इतर राज्यात 500 मॉल चालू झाले आहेत. पुरेशी खबरदारी घेऊन दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, चंदिगड, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, भोपाळ, इंदोर इत्यादी ठिकाणी मॉल सुरू करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी खबरदारी घेऊन मॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातले मॉल सुरू करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

याअगोदर मॉलमध्ये मनोरंजनासाठी येण्याची काही प्रमाणात पद्धत होती. मात्र आता ज्यांना फक्‍त गरजेची खरेदी करायची आहे, असेच लोक मॉलमध्ये येत आहेत. त्यामुळे मनोरंजनासाठी मॉलमध्ये येण्याचे प्रमाण कमी राहील.

मॉल सुरू झाल्यानंतर खबरदारीच्या काय उपाययोजना करायच्या याचा गृहपाठ आम्ही केला आहे. नागरिकांमध्ये अंतर ठेवणे, आरोग्य सेतू ऍप बंधनकारक करणे, एकाच शिफ्टमध्ये काम करणे, चाळीस टक्‍के कर्मचारी कामावर राहतील याची काळजी घेणे, अशा प्रकारच्या उपाययोजना आम्ही तयार ठेवल्या आहेत.

मॉल चालविण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागते. मात्र, मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील मॉल बंद असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे. त्यावरील व्याज चालू आहे. त्यामुळे मॉल चालकांचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले असल्याचे अमिताभ तनेजा यांनी सांगितले. परिस्थिती अशीच राहिली तर मॉलचे अस्तित्व आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here