Dhayari : अखेर ‘तो’ जगण्याची लढाई हरला.

0
691

बेड मिळत नसल्या कारणाने काल रात्री अलका चौकात नातेवाईक व राष्ट्रसेवा समूहाच्या कार्यकर्त्यांनी ऍम्बुलन्ससह रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केलं होतं. तरी सुध्दा प्रशासनाने गांभिर्याने दखल न घेतल्यानेच हा बळी गेला! : नातेवाईकांत प्रचंड संताप.

धायरी भागात राहणाऱ्या या 33 वर्षीय युवकाला मागील आठवडयात करोना सदृश लक्षणे होती. त्यामुळे फॅमिली डॉक्‍टर कडे तपासणी करून हा रूग़्ण घरीच थांबून होता. मात्र, मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास त्याला अचानक श्‍वास घेण्यास त्रास सुरू झाला. सुदैवाने त्याच्या कुटूंबियांना ऑक्‍सिजनची सुविधा असलेली ऍम्बुलन्स मिळाली.त्यात, ऑक्‍सिजन लावून त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी दुपारी दोन वाजता धायरी सोडली त्यानंतर सिंहगड्‌ रस्त्यावरील दोन हॉस्पीटल मध्ये चौकशी करून ते रूग्णाला घेऊन शहरातील जवळपास सर्व मोठया हॉस्पीटलमध्ये गेले. त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास ते नवी पेठेतील एका मोठया रूग्णालयातही गेले.

मात्र, तिथेही त्यांना बेड नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेले नातेवाईक व राष्ट्रसेवा समूहाच्या कार्यकर्त्यांनी  या युवकासह ऍम्बुलन्स घेऊन टिळक चौकातील छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकीच्या समोरच रस्त्यावर ठाण मांडून बसले. आधीच बेड मिळत नव्हता, तसेच ऍम्बुलन्स मधील ऑक्‍सिजनही 20 टक्केच शिल्लक होता. त्यावेळी चौकात असलेल्या पोलिसांनी त्यांना बेड मिळवून देण्यासाठी राष्ट्रसेवा समूह, तसेच पत्रकार यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला.

अखेर रात्री दहाच्या सुमारास त्यांना विश्रांतवाडी येथे एका खासगी रूग्णालयात बेड मिळाला. मात्र, तो पर्यंत या रूग्णाच्या उपचारास तब्बल 10 तास उशीर झालेला होता. मात्र, आज दुपारी या युवकाची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान, दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here