बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूला आज एक महिन्याहून जास्त काळ लोटला आहे. त्याच्या चाहत्यांना सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’बाबत खूप उत्सुकता लागून राहिली आहे. 14 जून रोजी अभिनेत्याने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला महिनाभराचा कालावधी उलटूनही त्याचे चाहते हे सत्य स्विकारू शकले नाही आहेत. सुशांतला श्रद्धांजलीच्या स्वरुपात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. कोरोनामुळे सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करणे शक्य नसल्यामुळे ओटीटीववर फिल्म प्रदर्शित होणार आहे.
कधी, कुठे आणि किती वाजता प्रदर्शित होणार ‘दिल बेचारा’?
सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा सिनेमा आज म्हणजे 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा याने केले आहे. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित होणार आहे. मुकेश छाब्रा यांनी घोषणा करून अशी माहिती दिली आहे या चित्रपटाचा प्रीमियर 24 जुलै रोजी 7.30 वाजता होणार आहे.हा सिनेमा सुशांतचा शेवटचा सिनेमा असल्या कारणाने, चाहत्यांना याबाबत खूप उत्सुकता आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या मेकर्सनी असा निर्णय घेतला आहे की, हा सिनेमा पाहण्यासाठी हॉटस्टारवर कोणतेही सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही. म्हणजेच, ज्यांनी हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन घेतले नाही आहे ते देखील हा सिनेमा पाहू शकतात.