तुकाराम मुंढेंच्या पाठीशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
146

मुंबई : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील संघर्षाची राज्यभरात चर्चा झाली. या संघर्षातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघी समोरासमोर आल्याचं चित्र दिसलं. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं आहे

‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुकाराम मुंढे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरु आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय. तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की लोकनियुक्त महापालिकेच्या? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे शिस्तप्रिय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.’तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. त्यामुळे शिस्तीच्या मागे उभं राहणार’, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.

‘एखादा अधिकारी कठोर किंवा कडक असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्यापाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे’, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

‘आततायीपणा कोणीच करु नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हीत जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here