महेश फासे (सांगली प्रतिनिधी)

क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुणअण्णा लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले लाड यांना याखेपेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना पूर्ण खात्री आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच ते सहा महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतर्फे ऑगस्ट अखेरीसच उमेदवारी निश्चित केली जाईल, असे सांगण्यात येते. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांचा समावेश या मतदारसंघात आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पदवीधर मतदारसंघात भाजपला टक्कर देण्याची पूर्ण तयारी लाड यांनी केली आहे. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात पूर्ण ताकदीने पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे.

बी. एस. सी. (अ‍ॅग्रिकल्चर) असलेले लाड यांनी क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याचवेळी सुशिक्षित पदवीधर बेरोजगार, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि प्राध्यापकांचे प्रश्न शासनदरबारी तसेच विद्यापीठ पातळीवर त्यांनी सातत्याने मांडले आहेत. अभ्यासू, संयमी नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात लाड यांनी 2008 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ती मिळू शकली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यांना त्यावेळी थांबायला सांगितले होते आणि 2014 मध्ये उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावेळीही त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागली होती. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवूनही लाड यांनी 2014 च्या निवडणुकीत लक्षणीय मते घेतली होती.

भाजपतर्फे शेखर चरेगावकर, हर्षवर्धन पाटील, स्वरदा बापट, प्रसन्नजीत फडणवीस यांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत. भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी आहे. राष्ट्रवादीचे उमेश पाटील (सोलापूर), बाळराजे पाटील (मोहाळ) आणि सारंग पाटील (सातारा) तसेच जनता दलातर्फे प्रा. शरद पाटील यांची नावेही चर्चेत आहेत.

लाड यांना राष्ट्रवादीकडून दोनदा उमेदवारी नाकारली गेली होती. त्यामुळे आता याखेपेस त्यांचा उमेदवारीवर हक्क आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here