तुम्ही कधी अर्धा तास लाईनमध्ये थांबून वडापाव खाल्लाय का?

0
614

हर्षदा केळकर (प्रतिनिधी)

वरील हेडिंग वाचून जरा आश्चर्यचकित झालात ना? पण ही खरीखुरी घटना घडलीय पुण्यामध्ये! पेशाने जादूगार असलेल्या सुप्रसिद्ध जादूगार प्रसाद कुलकर्णी यांनी लॉकडाउन मध्ये करायचे काय म्हणून वडापावचा व्यवसाय चालु केला आणि बघता बघता त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला. मीडियाने सुद्धा त्यांच्या या वेगळ्या व्यवसायाची दखल घेतली. पुण्यामधील सिंहगड रोडवर माणिकबाग मध्ये त्यांनी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली आणि आता काही दिवसात त्यांनी आपली दुसरी शाखा सिंहगड रोडवरच नांदेड फाटा येथे चालू केली.

उद्घाटनाला इतर खर्च न करता त्यांनी आपल्या वडापावची चव लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पहिल्या दिवशी 1 रुपयात वडापाव देण्याचे ठरविले आणि पाहता पाहता लोकांची गर्दी झाली. 1 रुपयात वडापाव मिळतोय म्हटल्यावर लोकांनी रांगा लावल्या आणि 1 रुपयात वडापाव घरी घेऊन गेले. जवळपास 500 मीटर पर्यंत रांगा गेल्या परंतु सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळले गेले. त्यामुळे लोक अर्धा-अर्धा तास रांगेत उभे होते परंतु एवढि गर्दी सुनियोजित नियोजनामुळे नियंत्रित करता आली. दिवसभरात जवळपास 3000 पेक्षा जास्त वडापाव विकले गेले. कोणताही व्यवसाय छोटा नसतो, त्याला मोठे करण्याचे कौशल्य तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हेच या तरुणाने दाखवून दिले आहे. वड्याची चव वाढण्यासाठी 4 ते 5 भाज्यांचे मिश्रण त्यात टाकले जाते आणि जोडीला सिंहगडावरील प्रसिद्ध कांदा-चटणी दिली जाते. आपसूकच लोकांची गर्दी झाल्याशिवाय रहात नाही.

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जादूगार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, लॉकडाउन मध्ये सर्व व्यवसाय जसे ठप्प झाले तसेच आमचेही व्यवसाय पूर्ण ठप्प झाले, पुढील वर्षभर शोज होणे शक्य नव्हते त्यामुळे ह्या व्यवसायात यायचा निर्णय घेतला. या व्यवसायाला त्यांचा अनेक वर्षे शो मध्ये काम करणारा सहकारी गजानन रविराव याने तेवढीच मोलाची साथ दिली आणि उभी राहिली कुलकर्णी वडापावची दुसरी शाखा! या दुसऱ्या शाखेमध्येही दिवसाचे जवळपास 500 वडापाव विकले जात आहेत. यातून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे कोणताही व्यवसाय छोटा नाही, तो मोठा करण्याचा आत्मविश्वास तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here